आदिवासी जमिनींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी… दलालांकडून आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक…

0
59

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्यासाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा योग्य मोबदला न मिळता दलालांच्या माध्यमातून आदिवासींची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी केला आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांना यासंदर्भात निवेदन सादर करून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पेण तालुक्यातील शितोळेवाडी आणि इतर भागांमध्ये आदिवासी जमिनींचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे…दलालांच्या संगनमताने या जमिनी विकल्या जात असून,आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळत नाही. बेकावडे यांनी नुकत्याच झालेल्या पेणमधील आमसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
बेकावडे यांच्या मते, आदिवासींच्या जमिनी संपादनाची पुन्हा तपासणी करावी व खातेदारांच्या बँक खात्यातील रक्कम दलालांनी लुबाडली आहे का, याची शहानिशा करावी. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.