खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना नगर परिषदेतर्फे राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. खोपोली शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजी मार्केट,बाजारपेठ,रुग्णालये,मंगल कार्यालये किंवा शाळेत गेल्यानंतर वाहने कुठे पार्क करायची ? ही सर्वात मोठी समस्या नागरिकांसमोर उभी ठाकली असून त्यात सुधारणा करण्यासाठी नगर परिषद हतबल नसल्याचे दिसून येत आहे. शहरात आणि शहराबाहेर गल्लीबोळात आज मोठ्या प्रमाणात हॉंटेल, कॅंफे शॉंप, चिकन, मटनची दुकाने, कपडे, किराणा मालाची दुकाने, छोटे-मोठे मॉंलसह विवाह समारंभासाठी मंगल कार्यालये बांधण्यात आली आहेत. मात्र, यातील बहुतेक ठिकाणी पार्किंगची सोय नाही. शहरातील बाजारपेठेत तसेच भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी लोक वाहने घेऊन येतात. आधीच रस्त्यांवर फेरीवाले आणि छोटे दुकानदार दुकाने थाटून बसल्याने पार्किंगला जागा राहत नाही. त्यामुळे गाडी कुठे पार्किंग करावी, असा प्रश्न लोकांसमोर उपस्थित होतो. पार्किंगची सुविधा नसल्याने कुठल्या तरी दुकानासमोर किंवा रस्त्यावर वाहने लावतात. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस अशा पार्किंगच्या ठिकाणी गाड्या ठेवल्यामुळे त्या उचलून घेऊन जातात किंवा जेमर लावत असतात आणि नागरिकांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड बसतो.
खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारीच्या निवासस्थान गेटपासून 50 मीटर डावीकडे व उजवीकडे नो-पार्किंग असलेचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी ट्रक, टेम्पो, पिकअप, रिक्षा, कार यासारखी वाहने दिवसभर उभ्या असतात. या उभ्या वाहनांचा गेटवरील साहेबांच्या कर्मचारीला कोणताच त्रास होत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘अर्थ’मय संबध असल्याने या वाहनांना नियम नाहीत, पण दुसरी वाहने लागली की, कर्मचाऱ्याचे पोट दुखायला लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे पत्रकाराची गाडी रस्त्याच्या बाजूला दिसली की कर्मचारी धाव घेत येथे गाडी उभी करु नका साहेबांची जागा आहे…साहेब कधीही येतील…तुम्हांला नियम माहीत नाही का…अशा शब्दांत दमदाटी करतात. रस्त्याच्या कडेला पत्रकार आपल्या स्वत:च्या गाडीत दोन-पाच मिनिटे बसून फोनवर बोलत असताना मुख्याधिकारी साहेबांच्या गेटवरचा कर्मचारी पत्रकाराला नो-पार्किग नियमाची भाषा सांगतो तर गेट लगत उभी असलेली इतर वाहने पार्किंगमध्ये आहेत की, नो-पार्किंगमध्ये हे त्याला माहित नसते का? या कर्मचाऱ्याला पत्रकारांच्या गाडीची इतकी एलर्जी का ? खोपोली शहरातील पार्किंगचे नियम फक्त पत्रकारांसाठीच आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खोपोली शहरातील असे कोणते ठिकाण नाही की, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण नाही आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षात खोपोली शहराचा खेळखंडोबा झाला आहे. खोपोलीकरांच्या डोंगरभर समस्या आहे. जिथे पहावे तिथे नियमांची खिल्ली उडवत कामे सुरु आहेत. मराठी शाळेसमोर बिनधास्तपणे कॉफी शॉप सुरु आहेत. या शॉप समोरील रस्त्यावर नो-पार्किंग असल्याचे बोर्ड लावून नागरिकांना दमदाटी केली जात असून आम्ही भाईची माणसे आहोत आणि हजारो रुपये भाडे देतो पोलिसही आमचे काहीच करू शकत नाही, असा धाक लोकांना दाखवतात. या कॉफी शॉपला मुख्याधिकारी यांनी परवानगी दिली की पोलिसांनी…हे कॉफी शॉप चालविण्यासाठी नियम, अटी, शर्थी नाहीत का ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. खोपोली शहरात नगर परिषदेने कोणकोणत्या ठिकाणी नो-पार्किंग लागू केली आहे. नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे केली आहे, याची सविस्तर माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी द्यावी, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे.