रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्री. एडके यांच्या कार्यशैलीवर रोह्यातील जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. विकासकामांमध्ये अपारदर्शकता, निकृष्ट दर्जाची कामे, अर्धवट राहिलेली विकास प्रकल्पे आणि ठेकेदारांचे खुलेआम लाड अशा मुद्द्यांवरून ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शहरात मंदिर बांधकाम अपूर्ण, पाणीपुरवठ्याची समस्या बिकट, औषध फवारणी बंद, तुंबलेली गटारे, अस्वच्छता आणि सर्वत्र खोदकाम सुरूच – अशी दयनीय परिस्थिती असताना मुख्याधिकारी केवळ इव्हेंट्स आणि फोटोजाठीच उत्सुक आहेत. त्यांना रोहा शहराच्या समस्या माहितीच नाहीत, असा आरोप समीर शेडगे यांनी केला आहे.
रोहा शहरात भुयारी गटार योजना सुरू आहे, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदाराने एस्टीमेटनुसार काम न करता मनमानी सुरू केली आहे. खोदकामानंतर योग्य रीतीने रोलिंग केले जात नाही, रेडी-मिक्स काँक्रीटचा वापर होत नाही, आणि कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याऐवजी मुख्याधिकारी केवळ या ठेकेदाराला सहकार्य करण्यात गुंतले आहेत, असा आरोप शेडगे यांनी केला. महिला सशक्तीकरणासाठी आणि नागरी सुविधांसाठी तब्बल 50 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले महिला भवन आज ठेकेदाराच्या गोडाऊनमध्ये रूपांतरित झाले आहे. हेच का प्रशासन? हा निधी जनतेच्या सुविधांसाठी होता की गुजरातच्या ठेकेदाराच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांचा प्रशासनावर वचक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली आहेत. मात्र, रोहा नगरपालिकेतील मुख्याधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसून, विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यामुळे तटकरे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे. मुख्याधिकारी जनतेसाठी काम करत आहेत की ठेकेदारांसाठी? असा थेट सवाल माजी नगराध्यक्षांनी उपस्थित केला आहे. महिला भवनासारखी इमारत ठेकेदाराच्या ताब्यात देण्यामागे कोणता सौदा झाला? नगरपालिकेच्या निधीचा वापर कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी होतो आहे, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
या प्रकरणी राज्य सरकार दरबारी आवाज उठवणार असल्याचे समीर शेडगे यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकारी एडके हे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून ठेकेदारांसाठी झटत आहेत, हे रोहेकर नागरिक सहन करणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. याप्रकरणी रोहा नगरपालिकेतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.