आनंद जोशी यांना रायगड प्रेस क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार… रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…

0
20

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

श्रीवर्धन येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आनंद जोशी यांना रायगड प्रेस क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रायगड प्रेस क्लबच्या २० व्या वर्धापनदिनी खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या शानदार पत्रकार सन्मान सोहळ्यात जोशी यांना रायगडचे खासदार व ओएनजीसीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या समारंभाला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा संस्थापक एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, वृत्तनिवेदक विशाल परदेशी, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, प्रेस क्लबचे अन्य मान्यवर उपस्थित होते. समारंभात खा. सुनील तटकरे, एस. एम. देशमुख, विशाल परदेशी, मिलिंद अष्टिवकर, राजू जोशी, मनोज खांबे आदींनी आपले विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले व रायगड प्रेस क्लबच्या विधायक कार्याला शुभेच्छा दिल्या.

आनंद जोशी हे गेली ३४ ते ३५ वर्षे पत्रकारता करीत आहेत. सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पगडी असे जोशी यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे. जोशी हे पत्रकारितेप्रमाणेच विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी श्रीवर्धन नगर परिषदेचे नगरसेवक म्हणूनही सेवा केली आहे. ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले असून, फेस्कॉम या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कोकण प्रादेशिक युक्ती विभागाचे उपाध्यक्ष आहेत. ते गायकही आहेत. सेवानिवृत्तांची संघटना, कोकण मराठी साहित्य परिषद आदी संस्थांच्या कार्यकारी मंडळातही ते कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रभूषण पुरस्कार व निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पत्रकारितेमधील योगदानाबद्दल त्यांना मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराबद्दल श्रीवर्धन प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजय गिरी व माजी अध्यक्ष प्रसाद नाझरे यांच्यासह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.