ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे फ्लॅट धारकांना सोसावा लागतोय नाहक त्रास… दोन दिवसात उपाययोजना न केल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढणार…

0
25

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड शहरातील केशरी आंगण सोसायटी धारकांना ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काकरतळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉल पर्यंत अंतर्गत कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम नगरपालिकेने चालू केले असून नगरपालिकेने रस्ता कॉंक्रिटीकरण काम करण्यासाठी एका ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र या ठेकेदाराने संबंधित रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम सुरू केले यामध्ये पाण्याची जुनी पाईपलाईन तोडून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले मात्र पंधरा दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. दिवसातून दोन पाणी टँकर तुम्हाला देईल असे आश्वासन ठेकेदारांनी दिले होते परंतु आत्तापर्यंत हे आश्वासन कधीच पूर्ण झाले नाही असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. यातच गटाराचे खोदकाम सुरू असताना सर्व दूषित पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहिल्यामुळे रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील येथील रहिवाशांनी केला आहे. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असून येत्या दोन दिवसात सर्व रहिवाशांच्या सोय सुविधा पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.