अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग शहरातील महेश टॉकीजच्या परिसरात पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीतून ६५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे… तीन अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली असून, अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे… दिनांक १० मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी प्रविण चंद्रकांत केणी (वय ४३, रा. मेटपाडा, कोळीवाडा, अलिबाग) यांनी आपल्या एम.एच.०६ सी.के. १३१८ या दुचाकीच्या डिकीत ६५,००० रुपये रोख ठेवले होते… ही रक्कम श्रीकृपा पतसंस्थेच्या खातेधारकांची असून, फिर्यादी काही आर्थिक व्यवहारांसाठी ती घेऊन जात होते…
फिर्यादीने दुचाकी बँक ऑफ बडोदा, महेश टॉकीजच्या बाजूला पार्क केली होती… त्याच वेळी, तीन अज्ञात चोरट्यांनी संधी साधत डिकीतील रोख रक्कम चोरून नेली… काही वेळाने फिर्यादी परत आल्यावर त्यांना चोरीची बाब लक्षात आली आणि त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली… या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे… पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, पोलीस निरीक्षक साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ८०२ पाटील हे तपास करत आहेत… परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे… या घटनेत एकूण ६५,००० रुपयांची रोकड चोरीला गेली आहे… चोरीमध्ये तीन अज्ञात इसमांचा सहभाग असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत… नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे…