तोंडरे-हायकल कंपनी विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू…

0
25

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल ) :-

नवीन पनवेल येथील तोंडरे हायकल कंपनीच्या गेटच्या बाजूला १७ मार्चपासून शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे… कंपनीतील स्क्रॅप, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बॉयलरची राख बाहेर काढणे, फोरक्लिप, हायड्रा, ॲम्बुलन्स ई. लागणारी वाहने कंपनीस पुरवणे ही कामे तसेच कंत्राटी कामगार पुरवणे या सर्व कामांमध्ये भूमिपूत्रांना समाविष्ट करावे या मागण्यांसाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण सुरू केलेले आहे… यावेळी शेकापचे काशिनाथ पाटील, युवा नेते विजय पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू जोशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते…

तळोजा एमआयडीसीत हायकल कंपनी ही येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे… या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी १९९९ पासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्र व्यवहार देखील अनेकदा करण्यात आले आहेत… २०२४ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची माहिती महामंडळाने दिलेली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे… मात्र शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही…. देशाच्या विकासासाठी जमिनींचे त्याग करणाऱ्या भूमिपुत्र शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे… या प्रकल्पामध्ये दहा ते बारा कुटुंब अवलंबून असताना भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कंपनी आस्थापना कडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत… कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी हायकल कंपनी गेटच्या बाजूला आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे….