गो-हत्या करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार… मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश रक्षणाचा निर्णय…

0
53

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाज लोकवस्ती असलेल्या खोपोली, शिळफाटा, चौक, तुपगाव, हाळ खुर्द, हाळ बुद्रुक, आजीवली , ठाणे न्हावे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाचा व गोवंश हत्या बंदी कायद्याचा सन्मान राखून यापुढे गो-रक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे खालापुरातील मुस्लिम वस्ती असलेल्या भागात गो हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना स्वत: मुस्लिम समाज बांधव पोलिसांच्या ताब्यात देतील,असे निवेदन आज रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले. यावेळी खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलिस निरीक्षक शितल राऊत, रसायनी पोलिस निरीक्षक संजय बांगर आदी उपस्थित होते.

खालापूर तालुक्यात 12 व 13 मार्च 2025 रोजी झालेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर दोन समाजात तेढ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक घार्गे यांनी मुस्लिम समाज व गोरक्षक यांच्यासोबत वेगवेगळी बैठक घेतली. या बैठकीत खालापूर तालुक्यातील जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले…दरम्यान, मुस्लिम समाजाने अभिमानास्पद पाऊल उचलत गोवंश रक्षणाचा निर्णय घेतला.

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आम्ही आठ गावातील मुस्लिम समाज बांधव शासन व कायद्याचे पालन करू इच्छितो. या धोरणानुसार आपल्याला अपेक्षित सहकार्य करण्याची हमी या निवेदनाद्वारे आपणास देऊ इच्छितो…वेळोवेळी खोपोलीसह संपूर्ण तालुक्यातील प्रशासन यंत्रणा पोलिस यंत्रणानी सर्व समाजात एकोपा जपून सर्वांना सहकार्य केले आहे. खोपोली व शिळफाटा येथील दोन समाजातील जबाबदार ग्रामस्थांनी जातीय सलोखा राखण्याबाबत खोपोली पोलिस निरीक्षक यांना एकत्रितपणे निवेदन दिले आहे…यामध्ये गाय (गोमाता), बैल प्रजातीच्या प्रत्येक जनावरांची काळजी घेऊ तसेच तालुक्यातील प्रत्येक गोधनाची पशुसंवर्धन विभागामार्फत संबंधित शेतकरी व त्याच्या गोधनाची नोंद करण्यात यावी, जेणेकरून पाळीव व भटके जनावर यांची ओळख होवून गोधन मालक यांची देखील ओळख होईल. यासाठी आमची एक समिती प्रशासनास सहकार्य करेल. आपण पोलिस प्रशासन गो रक्षणासाठी जो आदेश देईल, त्यास समितीतर्फे सहकार्य केले जाईल, अशीही ग्वाही यावेळी देण्यात आली.