सीमा देव भारतीय रजत पटावरील एक संसमरणीय सोज्वळ अभिनय सम्राज्ञी…  

0
65

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

नलिनी सराफ उर्फ सीमा रमेश देव (२७ मार्च १९४२-२४ ऑगस्ट २०२३) मराठी रंगभूमी आणि मराठी – हिंदी सिनेसृष्टीतील आणि दूरदर्शन वाहिन्यांवरील एक अनभिषिक्त सोज्वळ अजरामर व्यक्तीमत्व… आज २७ मार्च त्यांचा जन्मदिवस… दिवंगत सीमाताईंच्या जन्मदिवसा निमित्ताने त्यांच्या स्मृतीस आदरांजली.. !!
मुंबईतील गिरगावमध्ये जन्मलेल्या या लोभस अभिनेत्रीने ८० हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते… सन १९५७ मध्ये त्यांनी “आली या भोगासी” या मराठी चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत प्रवेश केला… जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखानो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला आणि हिंदी मधील “आनंद” यांसारख्या ८० हून अधिक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने त्यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते… त्यांचे मूळ नाव नलिनी सराफ असे होते… पण फिल्मीस्तानच्या एका चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली पण त्यांच्या काळात नलिनी जयवंत या अभिनेत्रीचा बोलबाला होता तेव्हा निर्मात्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना आपले नाव बदलावे लागले… त्यावेळची नूतन ही अभिनेत्री त्यांची आवडती होती… एका चित्रपटात नूतन यांनी सीमा या नावाने भूमिका साकारली होती आणि मग सीमा हेच नाव आपण धारण करायचे त्यांनी ठरवले आणि त्या “सीमा सराफ” झाल्या…

पुढे त्यांचे रुपेरी पडद्यावरील नायक रमेश देव यांच्या बरोबर लग्न झाले व त्या सौ. सीमा रमेश देव झाल्या. त्यांना दोन मुलगे आहेत…  मोठा अजिंक्य तर छोटा अभिनय…. अजिंक्यने अनेक हिंदी – मराठी चित्रपटात अभिनय केले आहे तर छोटा अभिनय हा चित्रपट दिग्दर्शन करतो…. प्रत्येक पिढीला त्या आपल्या कुटुंबातील वाटाव्यात इतका सच्चेपणा त्यांच्या भूमिकांतून दिसत असे…. आज सीमाताई आपल्यात नाहीत पण त्यांनी साकारलेल्या भूमिकांद्वारे त्यांचं आपल्या ह्रदयातील स्थान अढळ असणार आहे….