पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी,दुष्मी आणि ठाकूरपाडा परिसरातील ग्रामस्थ दगडखाणीतून बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या दहशतीखाली असल्याचे समोर आले आहे…मंगळवारी दिनांक ०१ एप्रिल रोजी रात्री ठाकूरपाडा येथील शिव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पुन्हा एकदा ओव्हरलोडेड माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचा उतारावर असताना ब्रेक फेल झाला,मात्र या वाहनाच्या पुढे आणखी एक अवजड वाहन असल्यामुळे सदर वाहन पुढील वाहनाला धडकल्यामुळे लोकवस्तीत शिरला नाही अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती…
ही जीवितहानी जरी टळली असली तरी या ठिकाणी ब्रेकफेलमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येते…ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी, खारपाडा व खरोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या दगड खाणीतून बेहिशोबी पद्धतीने उत्खनन सुरू असून या बेहिशोबी दगड, खडी, क्रशसँडची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोडेड वाहनांमुळे खारपाडा सावरोलि रोड ते खैरासवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे…या मार्गावर या अगोदरही अनेक ब्रेकफेलच्या घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे…अशा बेकायदेशीर वाहतुकीला महसूल आणि वाहतूक विभागाचे वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे…ही बेकायदेशीर वाहतूक न थांबल्यास आंदोलन करण्याचा स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्टचे शशिकांत ठाकूर, हर्षद ठाकूर, गोपीनाथ ठाकूर व ग्रामस्थांनी इशारा दिला आहे…