विद्यानगर मूकबधिर विद्यालय जीर्णोद्धार प्रकरणी अनास्था… नाकर्तेपणामुळे भूमीपूजन होऊन दीड वर्ष उलटले…

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

               अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथील जीर्ण झालेल्या मूकबधिर विद्यालयाच्या जागी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२१ मध्ये  कामाचा शुभारंभ झाला होता… मात्र अद्याप या इमारतीचे निम्‍मे कामही झालेले नाही…  प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्‍या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेत शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे…

विद्यानगर येथील शासकीय मूकबधिर विद्यालय ३५ वर्ष जुने होते… इमारतीला तडे, खिडक्यांच्या काचा फुटणे, प्लास्टर निखळणे आदी समस्‍या निर्माण झाल्या होत्या… जीर्ण झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता… ३१ गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे… त्यामध्ये आठ वर्ग (कक्ष ), मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधिक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चांचणी, वैद्यकीय तपासणी, अंतर्गत खेळांचे कक्ष व सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे… याशिवाय मूकबधिर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उद्यान, क्रीडांगण तसेच भोजन कक्ष, स्वयंपाकी निवासस्थान, व्यावसायिक प्रशिक्षण हॉल, पहारेकरी निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत…

इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्व-निधीतून दोन कोटी ४६ लाख ९२ हजार रुपये खर्च केला जाणार आहे… मात्र वर्षभरापासून नव्या मूकबधिर विद्यालयाचे काम संथ गतीने सुरू आहे…  भूमीपूजन होऊन दीड वर्ष होत आले… तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळालेली नाही… त्याचा फटका मुकबधिर विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना बसता आहे… सध्या मूकबधिर विद्यालय भाड्याच्या घरात आहे… परंतु पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व तेथील कर्मचाऱ्यांना शिकवताना अडचणी येत आहेत…