केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगड दौऱ्यावर… मंत्री भरतशेठ गोगावलेंनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक…

0
15

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

शिवपुण्यतिथीनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि.9 एप्रिल 2025 रोजी शासकीय विश्रामगृह महाड येथे राज्याचे रोजगार हमी खात्याचे कॅबिनेटमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली…या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी राजकुमार सानप,तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ,रायगड रोपवे प्रशासन,आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन,पाणीपुरवठा विभाग यांसह अन्य शासकीय,प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघात व जिल्ह्यात होत असल्याने तो सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे मंत्री गोगावले यांनी उपस्थित अधिकारीवर्गाला सांगितले आणि प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा  घेतला.

यामध्ये वाहनतळ,एसटी गाड्यांचे जाण्या-येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेच्या वापराच्या वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमा दरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान दिले. या बैठकीला सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधून या बैठकीची सविस्तर माहिती दिली.