माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नुकतीच प्रथमच स्वच्छता करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ही बाब विशेष लक्षवेधी ठरत असून, यामागील प्रमुख कारण म्हणजे नगरपंचायतीकडे असलेली सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या. सध्या केवळ ९ सफाई कर्मचारी आणि १ मुकादम असे एकूण १० कर्मचारी संपूर्ण १९ वॉर्डांची जबाबदारी पार पाडत आहेत. परिणामी, शहरातील अनेक भागांमध्ये नियमित स्वच्छता राखण्यात नगरपंचायत अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष बाब म्हणजे, वॉर्ड क्रमांक १६ मधील खांदाड परिसरातून मोर्बा रस्त्याशी जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची स्वच्छता नुकतीच १२ एप्रिल रोजी प्रथमच करण्यात आली. काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांच्या खर्चाने या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यात आले होते. मात्र, आजवर या भागात कोणतेही स्वच्छतेचे नियोजन नव्हते, ही बाब नागरिकांच्या विशेष निदर्शनास आली आहे.
स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे आवश्यक ती कारवाई होऊ शकलेली नव्हती. प्रशासकीय नियमानुसार प्रत्येक वॉर्डात किमान दोन सफाई कर्मचारी असणे अपेक्षित आहे. त्या हिशोबाने शहरासाठी किमान ३८ ते ४० सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, सध्या फक्त ९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे स्वच्छता उपक्रमांवर थेट परिणाम होत आहे.
याशिवाय, कार्यरत कर्मचाऱ्यांना दिवसा काम करून रात्रीही काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्या कामावर मोठा ताण निर्माण झाला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर, नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक ठरते.
वॉर्ड सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासन यांनी या प्रश्नासंदर्भात शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून किमान ३० नवीन सफाई कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे आहे.
दरम्यान, शेलार नाका ते खांदाड मार्ग हा मोर्बा रस्त्याशी जोडला गेला असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. विशेषतः शनिवार-रविवारसारख्या सुटीच्या दिवशी आणि वाहतूक कोंडीच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसून येते. त्यामुळे या मार्गाची नियमित साफसफाई होणे अत्यावश्यक असून, नगरपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
१२ एप्रिल रोजी सफाई कामगारांनी सदर मार्गाची स्वच्छता केल्यानंतर अनेक नागरिकांनी या स्वच्छतेचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सामाजिक माध्यमांवर स्टेटसद्वारे शेअर केले. काही नागरिकांनी हे व्हिडीओ आमच्या प्रतिनिधीकडेही पाठवले. या घटनेवरून परिसरात एकीकडे संताप व्यक्त करण्यात आला, तर काही नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरपंचायतीच्या या पावलाचे स्वागत केले.
दरम्यान, नगरपंचायतीच्या सफाई कामगारांकडून सार्वजनिक ठिकाणांची व रस्त्यांची स्वच्छता केली जाते. तर घरगुती कचऱ्याचे संकलन मात्र ठेकेदारामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्ट कामगार (घंटा गाडी) यांच्या माध्यमातून केले जाते, हा महत्त्वाचा फरक असल्याचे बाब समोर येते.
यादरम्यान सफाई कामगारांची संख्या कमी असल्याची बाब कशी समजली?
तर निमित्त होते वॉर्ड क्रमांक १६ येथील अंतर्गत रस्ता — राजीप मराठी शाळेपासून पुढे मोर्बा रोडकडे जोडलेल्या मार्गावरील नाल्याची समस्या. याच अनुषंगाने ही गंभीर बाब उघडकीस आली.