खाजगी रुग्णालयात प्रसूतीनंतर उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू… रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू…नातेवाईकांचा आरोप…

0
46

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबागमधील एका खाजगी रुग्णालयात प्रसूतीगृहासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला…रूग्‍णालयाच्‍या हलगर्जीमुळे हा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप मृत महिलेच्‍या नातेवाईकांनी केला आहे… या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परीचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

सुचिता सुशील थळे रा. घोटवडे, ता. अलिबाग या गर्भवती महिलेला सोमवारी  दि.१४ एप्रिल दुपारी बाळंतपणासाठी अलिबामधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुचिताचे सिझर करण्यात आले. तिने मुलाला जन्म दिला. रात्री सुचिताच्या छातीत जळजळ होऊ लागली. तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली. मात्र डॉक्टर आले नाही. मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडली… नातेवाईकांनी रूग्‍णालयात एकच गोधळ घातला. त्‍यानंतर डॉक्टर आले. सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वी सुचिताचा मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. डॉक्टर व परीचरिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. अलिबाग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्‍यान या खाजगी रूग्‍णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.