नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा आणि मायग्रेन आजाराने त्रस्त झालेला कुणाल पोपट जाधव (वय २०, हंसध्वनी गृहसंकुल सोसायटी,कळंबोली) याने कळंबोली येथील महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,कुणाल जाधव हा कळंबोलीतील हंसध्वनी गृहसंकुल सोसायटीत कुटुंबासह राहत होता. कुणालचे वडील पोपट जाधव हे मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या गोवंडी पोलीस ठाणे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. कुणाल नेरुळमधील तेरणा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तिसर्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून कुणालला मायग्रेनचा त्रास होत होता.
सतत मायग्रेनचा होणाऱ्या त्रासामुळे तो नेहमी असह्य होत असे.त्यामुळे त्याच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी कुणालची समजूत काढली… मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने गुरुवारी(दिनांक 10)सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुणालने महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाकडे गच्चीवर जाण्यासाठी चावी मागितली. सुरक्षारक्षकाने मात्र नकार दिला. काही वेळाने सुरक्षारक्षक गच्चीवर पाणी सोडण्यासाठी गेला असता, त्याच्यापाठोपाठ कुणालही गच्चीवर गेला. सुरक्षारक्षकाची नजर चुकवून कुणालने गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.