माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
डोंगरे ते वालेराव साहेब यांच्या घरापर्यंत संपूर्ण परिसर सांडपाण्याच्या भीषण दुर्गंधीने झाकला असून, रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. (पावशा) नाल्यात पुन्हा एकदा सांडपाणी मिसळल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सायंकाळी रहिवासी किशोर डोंगरे यांनी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी ज्ञानदेव पोवार यांना तोंडी तक्रार केल्यानंतर रविवारी (दि. 27 एप्रिल) पोवार यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली. त्यांच्या तपासणीत उघड झाले की मोर्बा रोडवरील महामार्गाच्या गटार पाइपलाइनमध्ये दोन पाइप्समध्ये मोठी तुट असल्याने सांडपाणी थेट खांदाड परिसरातील नाल्यात मिसळत आहे.
या दुर्गंधीमुळे परिसरातील हवा नाकातोंडाने घेणेही कठीण झाले असून, नागरिक त्रस्त आहेत. लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया, फुफ्फुसाचे विकार यांचा धोका प्रचंड वाढला आहे. नागरिकांनी वारंवार गटार सफाई व जोडणीचे काम अपूर्ण ठेवण्याचा आरोप केला असून, हे प्रशासनाचे गंभीर अपयश असल्याची टीका होत आहे.
रविवारी सायंकाळीच एक फॉग स्मोक पथकाने नाल्याजवळ, रस्त्यावर, उघड्या जागांमध्ये व घरांभोवती फवारणी करून मच्छर व दुर्गंधीचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून, कायमस्वरूपी सोडवणूक आवश्यक असल्याची नागरिकांची ठाम भूमिका आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 28 एप्रिल) नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये ज्ञानदेव पोवार व स्थानिक नागरिकांचे शिष्टमंडळ सहभाग घेणार असून, या बैठकीत समस्येवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
एकता मित्र मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले, “जर ही समस्या तात्काळ सोडवण्यात आली नाही, तर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. नागरिकांनी दिला इशारा – ‘आता पुरे, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन’
परिसरातील नागरिकांचा संयम सुटला असून, प्रशासनाने यावेळी तात्काळ आणि प्रभावी निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या समस्येवर फक्त चर्चेने नव्हे, तर कृतीनेच उत्तर द्यावे लागेल, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरणार, हे नक्की.