नवी मुंबईत 4 वर्षाच्या चिमुरड्यासोबत दुष्कृत्य… कारवाईसाठी पालक आणि मनसे आक्रमक…

0
51

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-      

नवी मुंबईतील सिवुडस येथील डीपीएस (DPS) शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी पालकांनी शाळेवर धडक देत आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्च्यात पालक वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते. या मोर्च्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग दाखवत निषेध नोंदवला. यावेळी ” निषेध असो, निषेध असो , शाळा प्रशासनाचा निषेध असो ” , ” सहआरोपी करा, सहआरोपी करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करा ” , ” अटक करा, अटक करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करा ” , ” निलंबन करा, निलंबन करा , शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करा ” अश्या घोषणा पालक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गैरवर्तनाबाबत पालकांनी माध्यमांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. हातावर काळया फिती लावून पालक व मनसे पदाधिकारी यांच्याकडून निषेध नोंदविण्यात आला.

मात्र या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणारे शाळेचे मुख्याध्यापक हे सुद्धा तेव्हढेच जबाबदार असून त्यांना सहआरोपी करत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालक वर्ग व मनसे पदाधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आली. यावेळी पालकांसोबत मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, मनसे शहर सचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, महिला सेना उपशहर अध्यक्षा दीपाली ढऊळ, शहर सचिव यशोदा खेडसकर, मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, अक्षय भोसले, उपविभाग अध्यक्ष सुनिल शिंदे, विनोद लांडगे, नितीन मराठे, शाखा अध्यक्ष चंद्रकांत कोळी, प्रकाश कोकाटे, मनसे विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव विपुल पाटील, गणेश भोसले, मधुर कोळी, मनसे वाहतूक सेना चिटणीस विष्णू कांबळे, महिला सेना विभाग अध्यक्षा नंदा मोरे, मनसे विद्यार्थी सेना विभाग सचिव शंकर घोंगडे पाटील, उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे, महाराष्ट्र सैनिक रामचंद्र कोकरे, संतोष गायकवाड, अमित चिले, किरण बेडेकर हे उपस्थित होते.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला होता.