नवीमुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
नवी मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज रॅकेटमध्ये समावेश असल्याच्या पुराव्यावरुन अटक केली आहे…याच प्रकरणात अन्य आणखी कोणाचा समावेश आहे का याची चौकशी या पथकाकडून केली जात आहे…यामध्ये आतापर्यंत खारघर पोलिस ठाण्यातील सचिन भालेराव, पोलीस नाईक संजय फुलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण तीन पोलिसांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यात पोलिस कर्मचारी विजय पाटील यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.नवी मुंबई पोलिसांचे नाव बदनाम करणाऱ्या अशा अधिकारी आणि कर्मचा-यांवर पोलिस आयुक्तांनीही कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. एकीकडे नशामुक्ती अभियान राबविण्यात नवी मुंबई पोलिस अग्रेसर असताना त्याच आयुक्तालयांतर्गत काम करणारे खाकी वर्दीतील पोलिस कर्मचारी ड्रग्ज रॅकेटमध्ये समाविष्ट असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार उघड झाले आहे. याच प्रकरणात या तीन पोलिसांसह चार जण तथाकथित खारघरचा ड्रग्ज डिलर असल्याचेही सुत्रांकडून कळाले आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठांच्या परवानगीशिवाय सायंकाळपर्यंत आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र नशामुक्त अभियानालाच पोलिसांनी काळीमा फासणे म्हणजे कुंपनानेच शेत खाल्ले असे म्हणावे लागेल. आता या प्रकरणी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नशामुक्त अभियान राबविण्यात नवी मुंबई पोलिस अग्रेसर असल्याचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता या नशामुक्तीची जबाबदारी असलेले पोलिसच ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने या अभियानाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सचिन भालेराव, संजय फुलकर यांच्या संपत्तीचीही चौकशी करावी. पोलिस दलातील साधे कर्मचारी असतानाही महागडया आलेशान कार खरेदी करतात. हे सर्व त्यांच्या पगारावर शक्यच नाही. याबाबत पोलिस आयुक्तांनी योग्य आणि पारदर्शी भूमिका घ्यावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे.