रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
स्टील उद्योगात आपले बळकट स्थान निर्माण करणाऱ्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीला त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वासाठी,विशेषतः शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी, “रोटरी सीएसआर पुरस्कार २०२५” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ (रायगड आणि पुणे जिल्हा) यांच्यातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमाचा थाटमाट पुण्यातील हयात रीजन्सी येथे अनुभवायला मिळाला. विविध क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करणाऱ्या कंपन्यांना येथे सन्मानित करण्यात आले, ज्यात पोस्को महाराष्ट्र स्टीलने आपला वेगळा ठसा उमटवला.
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातून कार्यरत असलेली ही कंपनी फक्त उत्पादनक्षमतेपुरती मर्यादित न राहता सामाजिक विकासाचा अविभाज्य भाग बनली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळांसाठी ई-लर्निंग सेटअप, विज्ञान किट्स, संगणक संच, शिष्यवृत्ती, बस सुविधा, ‘सिस्टरहूड रिलेशनशिप’ सारखे उपक्रम आणि मूलभूत शैक्षणिक सुविधा पोस्को सातत्याने पुरवते आहे.
या सामाजिक कार्याची दखल घेत निवड समितीने पोस्कोच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. पुरस्कार स्वीकारताना कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले, “हा सन्मान केवळ आमच्या सामाजिक कार्याची पावती नाही, तर भविष्यातील आमच्या प्रयत्नांना एक नवा ऊर्जादायी टप्पा आहे. शिक्षण आणि समाज उभारणीसाठी आमची बांधिलकी यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील.”
पोस्को महाराष्ट्र स्टीलने समाजोपयोगी उद्योग कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. उद्योग आणि समाज एकमेकांचे पूरक असू शकतात, याचे हे एक झळाळते उदाहरण आहे.या प्रेरणादायी यशाबद्दल पोस्को महाराष्ट्र स्टीलला मनापासून सलाम!