सामाजिक समस्या आपल्या घरातच तयार होतात… डॉक्टर अजय जोगळेकर…   

0
12

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

(श्रीकांत सहस्रबुद्धे)-सामाजिक समस्या या आपल्या घरातच तयार होतात असे प्रतिपादन डॉक्टर अजय जोगळेकर यांनी केले… १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठांच्या समस्या व आरोग्य या विषयावर ते बोलत होते… यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉक्टर अजय जोगळेकर, ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे अध्यक्ष सुभाष शेठ, उपाध्यक्ष संतोष शेठ, सचिव डॉक्टर चंद्रकांत दोसी आदी मान्यवर उपस्थित होते…  कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय नागरीक ठार झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली… त्यानंतर दीप प्रज्वलन गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…

यावेळी डॉक्टर जोगळेकर पुढे म्हणाले की, आज तुमच्या जेष्ठता उत्साह बघून मला फार आनंद झाला… महाड  मधील ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने दर महिन्याला कार्यक्रम होतात ते बघून फार बरे वाटले… तुमच्यासमोर सामाजिक समस्या असणार नाहीत असे मला वाटते कारण तुम्ही सर्वजण समाजामध्ये वावरत असतात… समस्या या आपल्या घरातूनच निर्माण होतात व या समस्यांवर आपल्यालाच मात करायची असते व ती आपण करतोच…. आज आपण ज्यांचा जन्म एक मे १९४० रोजी झाला आहे अशा १२ जेष्ठ सभासदांचा सत्कार केला हे बघून आनंद झाला… आपल्यालाही कोणीतरी आशीर्वाद द्यायला हवे असतात… आपण आता आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण रोज चालत जा तसेच मोबाईलचा वापर जास्त करू नका… आपण रोज वर्तमानपत्र वाचत जा त्यात येणारी शब्दकोडी सोडवत जा त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते… साधारण ६० ते ६५ च्या वयानंतर आपल्याला विस्मरण होऊ लागते बऱ्याच वेळेला काही गोष्टी आठवत नाहीत…  तसेच आपण रात्री जेवताना सर्व कुटुंबासोबत बसत जा त्यावेळी टीव्ही शक्यतो बंद ठेवा, असे निदान आठवड्यातून एकदा तरी एकत्र जेवायला बसत जा… घरामध्ये चालताना खाली बघत जा कारण पाण्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते… बाथरूममध्ये काळजी घ्या…. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्या असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या….

ज्यांचा जन्म एक मे १९४० रोजी झाला व ज्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आहेत अशा १२ जेष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला… यावेळी ज्येष्ठ नागरीक संघाचे कार्यकारिणी सदस्य हिरामण आंबवले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला… ज्येष्ठ नागरिक संघ महाडचे अध्यक्ष श्री सुभाष शेठ यांनी प्रास्ताविक केले… यावेळी जेष्ठ सत्कारमूर्ती श्री प्रभाकर भुस्कुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले…  ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या कार्यकारिणीच्या महिला सदस्यांनी जय जय महाराष्ट्र माझा व इतर पोवाडे सादर केले… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शर्मिला धारप यांनी केले… सौ करुणा शेठ यांच्या पसायदानाने झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ महाडच्या कार्यकारणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले… या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते…