अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी बस पालटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरच्या कर्नाळा अभयारण्यमधील घाटात रविवारी रात्री 11च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या खाजगी बस अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढलं. तर जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशातच या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले.कालांतराने पोलिसांनी मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत सुरू केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार,ओमकार ट्रॅव्हल्स नामक एका खासगी संस्थेची ही बस होती. यात ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे…पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला. घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस उलटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील एमजीएम रूग्णालसात उपचारांसाठी भर्ती करण्यात आले आहे. सध्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहे…मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.