खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करीत नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर परिसरात शिक्षकाच्या वेशात वास्तव्य करीत होता आणि खालापूर व रायगड पोलिसांना याचा थांगपत्ताच नव्हता.
प्रशांत कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात 2011 साली भारतीय दंड विधान संहितेतील कलम 387, 419,465, 467, 468, 120 (ब) तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 (संशोधित 2008) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता…या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्यास न्यायालयाने फरार घोषित करीत निरंतर अटक वॉरंट व जाहीरनामा जारी केला होता.
एसटीएस (ATS) सूत्रांच्या माहितीनुसार,प्रशांत कांबळे हा आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकविण्याचे ढोंग करीत आपली खरी ओळख लपवित होता. मात्र पुणे एटीएस (ATS) युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि 4 मे रोजी अधिकृतपणे अटक केली…आज (5 मे) त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्यास 13 मे 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक करीत आहे…हा आरोपी वर्षानुवर्षे पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत शांत जीवन जगत होता,परंतु शेवटी कायद्याच्या हाताला चुकवणे अशक्यच,हे या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या अटकेमुळे नक्षलवादी हालचालींना मोठा झटका बसला असून,आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवली आहे.