माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरच्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून,या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…
अपघातात मृत्यू झालेल्यांत खांदाड येथील वामन पवार, पाचोळे येथील दिपीका शेलार व दिनेश शेलार यांचा समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, म्हसळा येथून माणगावकडे वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. MH 06 BW 9867) चालक पूर्णपणे नियंत्रण हरपून चालवत होता. त्याने पोलिसांच्या वाहनास धडक दिल्यानंतर सायकलवरून जात असलेल्या पादचाऱ्यांना २० फूटपर्यंत फरफटत नेले आणि शेवटी फुटपाथवरील एका मच्छी विक्रीच्या दुकानात घुसला.अपघात इतका भीषण होता की,मृतांची स्थिती पाहून उपस्थित नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
घटनेनंतर शेकडो संतप्त नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर आणि मोर्बा रोड कॉर्नरजवळ मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनधारकाला तात्काळ अटक करण्याची आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची जोरदार मागणी केली…पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता…काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते,मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे आणि एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या अपघाताने शहरातील वाहतूक यंत्रणेच्या त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत.घटनास्थळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, नगरसेवक अजित तार्लेकर, नेते, रमेश मोरे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी, सामाजिक कार्यकर्ते संजय साबळे,आरिफ करबेलकर,रणधीर कनोजे, भाजपा कार्यकर्ते सौ. सतवे, देगांव गावचे सरपंच सौं.सुषमा वाघमारे, इतर प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील ग्रामीण भागातून अनेक लोक उपस्थित होते…माणगाव पोलीस या अपघाताच्या सर्व अंगांनी चौकशी करत असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.