चणेरा-बिरवाडी-गायचोळ रस्ता रखडल्याने संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; “३१ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करू”– PWD रोहेचे लेखी आश्वासन…

0
17

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):- 

चणेरा नाका (ता. रोहे) येथे चणेरे-बिरवाडी-पांगळोली ऊसर मार्गे रोहे जोडणाऱ्या रस्त्याचे रखडलेले काम आणि नागरिकांच्या रोजच्या हालअपेष्टांवर संतप्त होऊन आज जेष्ठ नागरिक संघ नविन पनवेल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काम लांबणीवर टाकल्याने आणि पावसाळ्याच्या उंबरठ्यावरसुद्धा रस्ता वाहतुकीस अयोग्य स्थितीत असल्याने संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता श्री. बागुल साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि “चणेरे-बिरवाडी-पांगळोली ऊसर मार्गे रोहे हा रस्ता ३१ मे २०२५ पर्यंत वाहतुकीस खुला करू” असे स्पष्ट लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत दिले. हे लेखी आश्वासन स्वीकृत करताना अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तत्काळ रस्ता वापरण्यायोग्य करून दिला जाईल आणि पावसाळ्यानंतर संपूर्ण मजबुतीकरणासह डांबरीकरण करून बारमाही वाहतुकीसाठी उपयुक्त केला जाईल, असेही यावेळी अधिकृतरित्या सांगण्यात आले. यामुळे आंदोलनकर्त्यांनी विश्वासाने आपले आंदोलन स्थगित केले असून, विभागाच्या पुढील कृतीकडे बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलिस निरीक्षक रोहा यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन संयमित आणि शांततेत पार पडले. प्रशासन, पोलिस व नागरिक यांच्यातील संवादातून मार्ग काढत आंदोलकांचा विश्वास संपादन करण्यात यश आले.

या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराविरोधात एकजुटीने उभे राहिल्यास प्रशासनालाही जाग येते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.आता प्रत्यक्ष कृती होते की केवळ लेखी आश्वासनापुरतेच हे राहतं, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.