पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी प्रदीप मोकल):-
पेण नगरपरिषदेच्या शरद पवार भवन येथे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिना अखेरीस होऊ घातलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्सचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धांमागची भूमिका, त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला होणारा फायदा, संघमालकांची भूमिका, रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट विकासासाठी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असून रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला अजून भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे. पायाभूत सुविधांचा अजून विकास करण्यासाठी एमसीए कटिबद्ध असून रायगड क्रिकेट संघटनेला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे एमसीएचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, अपेक्स कौन्सिल सदस्य राजू काणे, सुशील शेवाळे, अजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, सचिव प्रदीप नाईक, रायगड रॉयल्स संघमालक अलीशा बाहेती, रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे, रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवगिरे, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.