अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):-
प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने वार करून क्रूर हत्या करुन गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे…सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे ही घटना घडली आहे.
या घटनेने रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर संतोष दुधाणे रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड याने परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे जावून नर्स म्हणून काम करणाऱ्या पोर्णिमा अनंत देसाई, रा. देसाईपाडा, ता. सुधागड हिची हत्या करुन तेथेच गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे. ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पाली खोपोली राज्य महामार्गांवर परळी येथे कोंडी झाली होती.