मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी वारंवार रेल्वेमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर येथे थांबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना मिळाले असून पालघर येथे या गाड्यांना आजपासून थांबा सुरू होत आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार २२९५५ डाऊन व २२९५६ अप बांद्रा टर्मिनस ते भुज कच्छ एक्स्प्रेस आणि १२४८९ अप व १२४९० डाऊन बिकानेर – दादर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर आजपासून थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासाची अधिक सुविधा मिळणार असून उत्तर महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना विशेष लाभ होणार असल्याचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी प्रतिपादन केले.
बांद्रा – भूज कच्छ २२९५५ डाऊन एक्स्प्रेसला पालघर स्थानकात सायंकाळी ७.०० वाजता तर अप गाडीला सकाळी ९.३४ वाजता थांबा देण्यात आला आहे.
दादर – बिकानेर १२४९० डाऊन एक्स्प्रेसला दुपारी ४.१४ वाजता तर १२४८९ अप गाडीला सकाळी ११.१२ वाजता पालघर रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.
पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे वाढवण बंदर, विमानतळ प्रकल्प तसेच तारापूर औद्योगिक वसाहत व अन्य महत्त्वाचे केंद्र कार्यरत आहेत. वाढती औद्योगिक गरज व प्रवाशांची संख्या लक्षात घेता या गाड्यांच्या थाब्यांची या भागात प्रकर्षाने गरजही होतीच.
या निर्णयामुळे पालघर रेल्वे स्थानकाला आता “अ” दर्जा प्राप्त झालेला आहे. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण झाल्यापासून पालघरचा झपाट्याने होत असलेला वीकाज्स पाहता पालघर पासून दक्षिणेस व उत्तरेस जाणाऱ्या इतर गाड्यांनाही थांबायची आवश्यकता आहे असा सूर आता येथील जनतेतून येऊ लागला आहे आणि खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती देखील आहेच.