चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न… प्रसंगावधान राखत मुलीने चालत्या दुचाकीवरून घेतली उडी…  

0
15

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.60 वर्षीय अलिम आयुब कर्जिकर याने चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र,मुलीने प्रसंगावधान राखत चालत्या दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे. या प्रकरणाने रोहा परिसरात खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज सुटल्यानंतर सदर मुलगी रोहा एस.टी. स्टॅण्ड परिसरात उभी होती. त्यावेळी  अलिम कर्जिकरने “तुला घरी सोडतो” असे सांगत तिला आपल्या दुचाकीवर बसवले. चनेरा स्टॉपवर सोडण्याचे आश्वासन देत तो तिला घेऊन निघाला.

प्रवासादरम्यान त्याने मुलीला चॉकलेट दिले, ज्यामुळे तिला संशय आला व तिने स्वतःच्या बचावासाठी चालत्या दुचाकीवरून उडी मारून आरडाओरड केला. स्थानिकांनी तातडीने धाव घेत अलिमला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलिम कर्जिकरला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहे. रायगड जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुली आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “जोपर्यंत अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. रोह्यातील या घटनेत मुलीने दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्य यामुळे ती मोठ्या संकटातून बचावली. तिच्या सावधपणामुळे आरोपीच्या कृत्याला वेळीच आळा बसला. दरम्यान रोहा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.