खारघर शहर दारूमुक्त राहण्यासाठी संघर्ष… विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने लाक्षणिक उपोषण मागे…

0
13

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल)

पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त शहर अशी असून गेल्या अनेक वर्षात ही ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही काही धन दांडग्या व्यावसायिकांनी दारू विक्रीचे परवाने मिळवण्याचा प्रयत्न केला होता,परंतु खारघर संघर्ष समितीच्या सततच्या विरोधामुळे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.
मात्र, मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा काही मंडळी दारू विक्रीचे परवाने मिळवण्यासाठी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खारघर संघर्ष समितीच्या वतीने काल शिल्प चौक, खारघर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था व विविध संघटनांनी उपोषण स्थळावर जाऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.

आमदार विक्रांत दादा पाटील यांनी खारघर शहर दारूमुक्त रहावे, ही मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आक्रमक पणे मांडली होती. यानंतर त्यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले. उपोषणाच्या दिवशी त्यांनी स्वत: उपोषण स्थळी भेट देऊन खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आमदार विक्रांत दादा पाटील यांनी उपोषणकर्त्यांना धीर देत “खारघरची दारूमुक्त शहर ” ही सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी मी प्रशासनाशी अधिक ताकदीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले तसेच खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन संघर्ष समितीने आपले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सध्या मागे घेतले आहे.
खारघरच्या दारूमुक्त ओळखीला कुणीही धक्का लावू नये, ही आमची भूमिका स्पष्ट आहे आणि खारघर संघर्ष समितीच्या दारू मुक्त शहर या मागणीला पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही आमदार विक्रांत दादा पाटील यांनी यावेळी दिली.