महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड पोलादपूर तालुक्यातील दिव्यांगांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी दिव्यांगांच्या विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दि. २५ मे रोजी चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले असल्याची माहिती प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जुक यांनी दिली
मा. राज्य मंत्री तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली “प्रहार दिव्यांग क्रांती संघटना” संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सवलती व त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः महाड व पोलादपूर तालुक्यांमध्ये संघटनेची कार्यरत शाखा दिव्यांगांच्या हितासाठी सातत्याने कार्य करत आहे.
महाड तालुक्यात सुमारे २,५०० पेक्षा अधिक दिव्यांग बांधव आहेत, परंतु अद्यापही बरेच दिव्यांग बांधव विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर, रविवार, दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता दिव्यांग मार्गदर्शन मेळावा,महाड नगरपरिषदेच्या चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय अन्न सुरक्षा योजना, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांबाबत अर्ज भरणे, मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येणार आहे. तरी या मार्गदर्शन मेळाव्याला महाड पौलादपूर तालुक्यातील अपंग बंधू भगिनीने आवर्जून उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार अपंग क्रांती संघटनाचे महाड पोलादपूर अध्यक्ष फैज उमर हुर्जूक यांनी केले आहे.