लोणावळाच्या हजरत कासिम शाह वली बाबांचा उरूस साजरा… शेकडो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ…

0
13

लोणावळा शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

लोनावळा शहरातील हजरत कासिम शाह वली (र. अ.) बाबांचा उरूस गुरुवार, 22 मे 2025 पासून सुरु झाला आहे. हा उरूस सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हजरत कासिम शाह वली (र. अ.) बाबांचा उरुस सलग चार दिवस सुरु असल्याने हजारोंच्या संख्येने लांबून लांबून येणाऱ्या भाविकांनी बाबांच्या मजारवर फुलांची चादर, गिलाफ अर्पण करीत जियारत (दर्शन) केली.

गुरुवार, 22 मे रोजी मौलाना सय्यद अमीनुल कादरी व मौलाना मुफ्ती सलमान आजरी यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोहम्मद पैगंबर (स. अ. व.) विषयी माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर दरगाह शरीफच्या नवीन इमारतीचे उदघाटन मौलाना सय्यद अमीनुल कादरी यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. बाबांच्या मजारसमोर हजर राहून फुलांची सुंदर चादर चढवून कुराणचे पाठ करीत सर्वांच्या सुख समाधानासाठी दुवा (प्रार्थना) करीत फातिहाख्वानी देवून नियाज वाटप करण्यात आली.

शुक्रवार, 23 मे रोजी 5.30 वाजता कुरानख्वानी करण्यात आली. रात्री 7.30 वाजता भव्य संदलद्वारे (गिलाफ) फुलांची चादर, गुलाबांची फुले पालखीमध्ये ठेऊन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली… बाबांच्या दर्ग्यावर गिलाफ अर्पण करण्यात आली… दरगाह शरीफला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. उरूसनिमित्ताने बाबांच्या मुरीद व उरूस कमिटीने दर्गात जय्यत तयारी केली होती. लंगर (जेवण) व बसण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. बाबांचा उरूस अंदाजे जवळजवळ 150 ते 200 वर्षापासून होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. प्रतिवर्षी या उरुसाला सर्व समाजाचे भक्तगण उपस्थित राहतात आणि मजारवर दरुद शरीफ, नात शरीफ आणि कुराणचे पठण करीत अर्पण करण्यात येते. अनेक जण आपल्या मन्नती घेऊन मजारवर फुलांची सुंदर चादर चढवतात आणि अल्लाहकडे प्रार्थना करतात. बाबांच्या दर्ग्यांवर आपले संकट दूर होण्यासाठी विविध मन्नती केल्या जातात व त्या पूर्ण होतात, अशी भाविकांची भावना असल्याने दरवर्षी उर्सला भाविकांची मोठी उपस्थिती असते. दर्ग्याच्या परिसरात फुले, चादर, इतर सुगंधी अत्तर, टोपीची दुकाने तसेच लहान मुलांची खेळणी, कपडे, काचेचे डिनर सेट, मिठाई, हॉटेलसह विविध पद्धतीची दुकाने लावण्यात आली होती.

उर्साच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी सुन्नी मुस्लिम जमात अमलगमेटड ट्रस्ट व ख्वाजा गरीब नवाज संस्था (लोनावाला शहर) च्या माध्यमातून कव्वल जुनैद सुल्तानी आणि हाजी मकर्रम अली वारसी, अजीम नाजा यांचा शानदार कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोणावळा शहरात जात,धर्म,पक्ष असा कोणताही भेदभाव न बाळगता उरूस शरीफचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी लोणावळा, खोपोली, मावळसह महाराष्ट्रातील विविध परिसरातील भाविक हजरत कासिम शाह वली बाबा दर्ग्यात दर्शन घेतात.भाविकांसाठी कमिटीच्यावतीने न्याज (गोड भात)ची व्यवस्था करण्यात आली होती.