उत्तरशीव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अधिकारी दहिसर हद्दीतील मौजे गोठेघर येथे ३ हेक्टर जागेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने उद्धघाटन केलेले खेळण्याचे मैदान आहे… मात्र या मैदानावर म्हाडाकडून मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे…मैदान राखीव ठेवण्यासाठी गुरुदत्त मित्र मंडळाकडून ग्रामपंचायत नागांवमध्ये लेखी अर्ज देखील करण्यात आले…मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले का? असा सवाल उपस्थित होत आहे…भंडाली, नागांव, उत्तरशिव, डायघर, गोठेघर, माणिकपाडा, मोकाशिपाडा या पंचकोशीतील गावातील खेळाडूंना भविष्यात या मैदानाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार होता… मात्र म्हाडाने केलेल्या या अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त झाले आहेत…
सद्यस्थितीत म्हाडाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेकरिता नमूद जागा आरक्षित करण्यात आली असून सदर योजनेमुळे संपूर्ण क्रीडांगण बाधित झाले असल्याने या विभागातील होतकरू खेळाडूकरिता क्रीडांगण शिल्लक राहिले नाही. त्यामुळे येथील खेळाडूंमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे…या क्रीडांगणाला ठाणे जिल्ह्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगण असे नामकरण करण्यात आले असून तसा ठराव देखील करण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तुत जागा ही क्रीडांगणाकरिता आरक्षित रहावी अशा नागरिकांच्या भावना आहेत.
ग्रामस्थांच्या मते सदर जागेपैकी तीन हेक्टर इतका भूखंड क्रीडांगणासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. या योजनेमधून हा भूखंड वगळून इतर शासकीय जमिनीवर योजना राबविल्यास योजना देखील पूर्ण होईल व क्रीडांगणाकरिता भूखंड ही राखीव राहील, मात्र केवळ क्रीडांगणाच्या जागेवर योजना राबविल्यास खेळाडूच्या तसेच गावकऱ्यांच्या हिताचे नसल्याने या योजनेस पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह उबाठा गट उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा विरोध आहे… उत्तरशीव येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाविषयी ग्रामस्थांची असलेली भूमिका शासनापर्यंत पोहचवण्यासाठी मंगळवार दि.२७ मे रोजी उत्तरशिव ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मैदानावर जमले होते…ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय म्हाडाकडून इमारत बांधण्याचे काम सुरु असून आमचा याला तीव्र विरोध आहे…तसेच मैदान ग्रामस्थांसाठी ८ दिवसात अधिकृत न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा शिवसत्ता टाइम्सशी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिला…