एमआयडीसीच्या पाईपलाईनच्या कामामुळे पेझारीत शेतांमध्ये पाणी… भाजपचे नेते पंडित पाटील व चित्रा पाटील यांनी अधिकाऱ्यांची घेतली भेट…  

0
23

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील पेझारी आणि आंबेपूर येथील एमआयडीसीच्या पाईपमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर कराव्यात  व इतर मागण्यासाठी भाजपचे नेते माजी आमदार पंडित पाटील व चित्रा पाटील यांनी बुधवारी एमआयडीसीच्या नागडोंगरी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

एमआयडीसीची पाईप लाईनच्या कामामुळे पेझारी नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते…पेझारी ते शहापूर आणि पेझारी नाका ते चरी रस्ता एमआयडीसीच्या अंतर्गत आहे. त्यामुळे ही कामे तात्काळ व्हावीत यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. कामे अपूर्ण असल्यामुळे आणि पाऊस लवकर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यासाठी आज एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. उर्वरित कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्य म्हणजे आंबेपूर आणि पेझारी गावात एमआयडीसी आहे. त्यामुळे एमआयडीसीमार्फत या गावांना सीएसआर मिळावा, अशी मागणी होती. यावरही चर्चा झाली असून अधिकाऱ्यांनी आश्वासित केले आहे. एमआयडीसीचे बॅक वाॅटर खाडीतून पुढे जाते. एमआयडीसीच्या फिल्टर प्लॅन्टमधून निघणारा कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतांमध्ये पाणी जात आहे. हा मुद्दाही अधिकाऱ्यांकडे मांडला असून तेथील नाला साफ करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी पाठपुरावा केला आहे. इतर गावांना ज्याप्रमाणे सुविधा मिळतात त्या प्रमाणे या गावांना सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली असून अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मागच्या सरकारमध्ये आम्ही विकास निधीची मागणी केली होती त्याप्रमाणे विकासनिधी मंजूर झाला होता. मात्र यंत्रणेने पुढील प्रक्रीया केली नाही. हाही मुद्दा आहे. पेझारी, बांधण, शहापूर येथे विकासकामे मंजूर करून आणली आहेत. आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती. ही प्रक्रिया आता जलद गतीने करावी, अशी मागणी केली आहे. पेझारी ग्रामपंचायत कार्यालय, आंबेपूर क्रीडांगड निधी आणला आहे. मोठे शहापूर ते धेरंड रस्ता रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांसाठी निधी आणला आहे. शहापूर शाळा कंपाऊंड वाॅल मंजूर केले आहे याबाबत प्रशासनबरोबर चर्चा करून ही लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वाशन दिले आहे, अशी माहिती भाजपचे नेते माजी आमदार पंडित पाटील  यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.