भरतशेठ गोगावले व सुनिल तटकरे यांच्यातील वाद विकोपाला… आगामी स्थानिकमध्ये राष्ट्रवादीला वगळून राजकारण करण्याचे संकेत…

0
29

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील दोन घटक पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. काही झाले तरी चालेल; पण रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरेंसोबत आम्ही बसणार नाही, अशी भूमिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली आहे… कोकणातील रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद वाढला असून राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये रस्सी खेच वाढली आहे… अशातच मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. तटकरे यांनी केलेली नॅपकिनची नक्कल गोगावलेंसह शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून आता याचा थेट फटका महायुतीला बसला आहे. आगामी स्थानिकच्या तोंडावर गोगावले यांनी थेट आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सभेत महायुती नाही युती असा उल्लेख केल्याने महायुतीला पहिला तडा रायगडमध्ये गेल्याची चर्चा सुरू झाली आहे… तर गोगावले यांनी आगामी स्थानिकमध्ये राष्ट्रवादीला वगळून राजकारण केलं जाईल असेच संकेत दिले आहेत… यामुळे आता खासदार तटकरेंच्या गोगावले विरोधाच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला कोकणात सेटबॅक बसण्याची शक्यता वर्तवली जातेय… आगामी स्थानिकच्या निवडणुकीत (जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका) राज्यात महायुती एकसंघ लढणार आहे. जेथे गरज असेल तेथे मैत्रिपूर्ण निवडणूक होणार आहे.पण स्थानिकच्या आधीच महायुतीत मिठाचा खडा रायगडमध्ये पडला असून महायुती संपूष्टात येण्याची शक्यता आहे.येथे तटकरे आणि गोगावले यांच्यातील वादाची झळ महायुतीला बसली असून पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या वाद आता स्थानिकमध्ये तटकरे विरूद्ध गोगावले अशा सामन्यापर्यंत येऊन पोहचला आहे. दरम्यान गोगावले यांच्यासह शिवसेना आमदार आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही तटकरेंचा काटा काढण्याचा निश्चय केला आहे. गोगावले यांनी तर थेट दंड थोपाटत, आता काही झालं तरी चालेल. सगळ्या ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार, पण त्यांना (तटकरे) सोडून.आता महायुती नाही तर युती म्हणूनही निवडणूक लढायची असल्याचा उल्लेख गोगावले यांनी केला. यामुळे रायगडमध्ये आगामी स्थानिकची लढत विरोधात असणाऱ्या ठाकरेंची शिवसेना असो किंवा शेकाप यांच्याशी नाही तर तटकरेंविरूध गोगावले अशीच होईल, अशी शक्यता आहे… याचवेळी कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे व सुनील तटकरे यांच्यातील वादही जुना आहे. त्यांनी देखील तटकरेंवर जोरदार टीका केली. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी, रायगडमध्ये तीन आमदार शिवसेनेचे आणि तीन आमदार भाजपचे आहेत. पण त्यामध्ये भरतशेठच आमचे मंत्री असून या निवडणुकीत आम्ही सगळे तयारीशी लढणार असून तटकरे हेच राजकीयदृष्ट्या टार्गेट असतील असेही संकेत दिले आहेत.