घराच्या खिडक्या उघड्या दिसल्याने चोरट्याने डाव साधला… चोरटयांनी घरफोडी करून ४ लाखांचा सोन्याचा माल लंपास…

0
8

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-

मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील खारपाडा गावात घरफोडी करून चार लाख दहा हजार रूपयेचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला दादर सागरी पोलिसांनी गजाआड केले असून चोरीतील शंभर टक्के मालमत्ता यशस्वी परत मिळविण्याची कामगिरी केली आहे. दादर सागरी पोलिसांच्या या कामगिरीचे रायगडच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कौतुक केले आहे.

सविस्तर घटना अशी की, २ ते ९ जून २०२५ दरम्यान फिर्यादी सत्यजित सुरेश वाजपेयी रा.खारपाडा ता.पेण यांच्या राहत्या घरात खिडकीतून प्रवेश करून कपाट खोलून अज्ञात चोरट्याने ४ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आणि रोकड चोरली होती. या प्रकरणी दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार अतिष पाटील, नंदन पाटील यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित गुड्डू हरेराम सिंग (वय १९) मूळ राहणार उत्तरप्रदेश सध्या राहणार खारपाडा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आणि पोलिसी खाक्या दाखविला असता शेवटी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुड्डू सिंग याच्या कडून सोन्याचे मंगळसूत्र (₹३,१५,०००), सोन्याचा नेकलेस (₹९०,०००), पिवळसर धातूचा नेकलेस (₹१,०००), व रोख रक्कम ₹४,२०० – एकूण ₹४,१०,२०० किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

चोरीतील शंभर टक्के मालमत्ता यशस्वी परत मिळविण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शखाली दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, सहाय्यक फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार अतिष पाटील, नंदन पाटील यांच्या पथकाने पार पाडली. यामुळे परिसरात पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.