अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
भरपूर टक्के मिळवणारे नागरिक आपल्याला निर्माण करायचे नाहीत,तर भारत जगाच्या दृष्टीने सर्वाेच्च हाेईल, असे नागरिक घडवायचे आहेत.यासाठीचा आजचा कार्यक्रम म्हणजे संस्कार आहे, असे प्रतिपादन लेखक गीतकार प्रविण दवणे यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी तसेच परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह गुणीजन शिक्षकांच्या सन्मानाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता अलिबाग मेघा चित्र मंदिर येथे पार पडला.त्याप्रसंगी प्रविण दवणे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बोलत हाेते.समर्थ फाऊंडेशनच्या संस्थापक अॅड. मनस्वी मोहिते यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला हाेता.त्याला प्रिझम सामाजिक संस्थेचा हातभार लागला. मेघा चित्रमंदिर येथील सभागृहात गर्दीचा महापूर आला होता.तसेच मुरुड तालुक्यातील वळके येथील इलिझम रिसॉर्ट येथे देखील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
गुणवत्ता यादी ही तुम्ही मिळवलेल्या मार्कांची यादी असते, मात्र व्यक्तीमत्व ही जीवनाची गुणवत्ता यादी आहे. याचा पुढील आयुष्यात कधीच विसर पडू देऊ नका, असा माेलाचा सल्ला दवणे यांनी उपस्थितांना दिला. सध्या पावसाचा हंगाम सुरु आहे. हा कालावधी म्हणजे बीयाणे पेरण्याचा, रुजवण्याचा आणि बहरण्याचा ऋतू आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याचा याेग समर्थ फाऊंडेशनने साधल्याचे दवणे यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार हे जीवनात महत्वाचे आहेत. त्यासाठी काजळाची ओंजळ करावी लागेल. तेव्हाच यश तुमच्या पदरात पडले. शिक्षण घेतल्यावर नाेकरी, सर्वोच्च व्यवसाय, गलेलठ्ठ पगार, पदेशात जाऊन स्थायिक हाेण्याचे स्वप्न असा संकुचीत विचार मनात आणू नका. ते तर तुम्ही मिळवालच मात्र देशासाठी, समाजासाठी आपण काही तरी देणे लागताे. हा विचार मनात ठेऊन माणूस म्हणून जगाला शिका आणि शिकवा, असा संदेश देखील त्यांनी दिला.
तुमचे आता बालपण संपले आहे. आता तुमच्यातील किशोरवस्थाही पंख उघडण्यासाठी तयार आहे. याचाही विसर पडू देऊ नका. आता मिळालेल्या यशावर हुरळून जाऊ नका. कारण यश हे फ्रिजमध्ये ठेऊन नंतर वापरता येत नाही. त्यासाठी कायम मेहनत आणि जिद्द ठेवण्याची तयारी ठेवा असेही त्यांनी सांगितले.गरिबीत राहून संघर्ष कसा केला याचे किस्से दवणे यांनी उपस्थितांना सांगितले.

