अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग शहर व परिसरात सध्या मोकाट व बेवारस जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.मुख्य रस्ते,बाजारपेठा,तसेच गावागावातील अंतर्गत मार्गांवर ही जनावरे मुक्त संचार करताना दिसतात…विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यांवर झोपलेली किंवा खाद्याच्या शोधात वाहतुकीच्या मार्गात आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे…
या समस्येमुळे वाहनचालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागत आहे…अनेकवेळा दुचाकीस्वारांना अचानकपणे जनावरे आडवी येतात आणि त्यातून गंभीर अपघात घडतात…काही घटनांमध्ये प्रवाशांचे प्राणही गमवावे लागले आहेत…यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.पालिकेने मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी मोहिमा राबवल्या असल्या, तरी त्यात फारसा फरक पडलेला नाही…गोशाळा आणि तात्पुरत्या निवाऱ्यांची कमतरता, तसेच जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाईचा अभाव यामुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे…या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जनावरांचे मालक असल्यास त्यांच्यावर जबाबदारीची जाणीव ठेवावी,तसेच प्रशासनाने जनावरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून तातडीने कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे…अन्यथा अपघातांची संख्या वाढून नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही…