खांदाडमध्ये स्वच्छतेची शंभरी महिलांच्या आवाजाला मिळाले यश!

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

शहरातील प्रभाग क्र. १६ खांदाड येथे माणगाव नगर पंचायतच्या स्वच्छता विभागामार्फत घरगुती कचऱ्याचे संकलन मागील १०० दिवसांपासून सलगपणे, खंड न आणता आणि नियमितपणे सुरू आहे. ४ जुलै २०२५ रोजी या सेवेने यशस्वी १०० दिवसांचा टप्पा पूर्ण केला असून, २८ मार्च २०२५ पासून ओला व सुका घरगुती कचरा उचलण्याची नियमित सेवा सुरू आहे.

या यशस्वी सेवेमागे एक मोठा वाटा खांदाड येथील महिलांचा असून त्यांच्या सातत्यपूर्ण आवाजानेच ही घसघशीत यशोगाथा घडली आहे. विशेषतः या महिला बहुतेक जेष्ठ नागरिक असून, घरगुती कचरा वेळेवर न उचलल्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेबाबत त्या अस्वस्थ होत्या. त्यामुळेच त्यांनी स्वच्छतेबाबतची जागरूकता दाखवत, आमच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला.त्यांचा हा सामाजिक भानाने केलेला आवाजच माध्यमांतून पोहोचत प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यानंतरच ही नियमित सेवा सुरू झाली.

५ जुलै २०२५ पर्यंतच्या या १०० दिवसांच्या कालावधीत एक-दोन अपवाद वगळता ही सेवा नियमितपणे दिली गेली आहे. काही दिवस वाहन बिघाडामुळे किंवा या सेवेचा मुख्य आधार असलेले वाहनचालक वैयक्तिक कारणामुळे रजेवर असल्यामुळे सेवा खंडित झाली होती, मात्र हे अपवाद वगळता संपूर्ण कालावधीत नियमितता कायम राहिली आहे…

पूर्वी ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान, घरकचरा वेळेवर न उचलल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. काही वेळा सलग ५ दिवस कचरा न उचलल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. महिलांनी व विशेषतः जेष्ठ महिलांनी हे प्रश्न वेळोवेळी मांडले होते.

यानंतर २८ मार्च २०२५ रोजी आमच्या बातमीनंतर प्रशासनाने तातडीने लक्ष दिले आणि घरगुती कचऱ्याचे नियमित संकलन सुरू झाले. आज १०० दिवसांची ही सलग सेवा पूर्ण होत असताना, खांदाड ग्रामस्थ समाधानी आहेत आणि माणगाव नगर पंचायत तसेच संबंधित स्वच्छता पथकाचे मनापासून कौतुक करत आहेत.

या सेवेसाठी माजी न. पं. चे नगराध्यक्ष तथा सध्या प्रभाग क्र. १६ चे नगरपंचायत सदस्य ज्ञानदेव पोवार यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक बदल झाला असून, त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.ग्रामस्थांमध्ये आता स्वच्छतेबाबत जागरूकता वाढलेली दिसते.माणगाव नगर पंचायतच्या पथकाने व स्वच्छता विभागाच्या संबंधित युनिटने राबवलेली ही मोहीम कौतुकास पात्र ठरली आहे. त्यांनी अशीच सेवा भविष्यातही सुरू ठेवावी, अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

दरम्यान, सुरुवातीस असलेली सेवेतली अनियमितता दूर होऊन, नियमिततेने सेवा सुरू झाली आणि पहिल्या आठवड्यातच यशस्वीतेची नोंद झाली. पुढे सलग एक महिना, नंतर दोन व तीन महिने अशी सेवा सुरूच राहिली. त्यानंतर ९० दिवसांचा टप्पा पार करत आणखी १० दिवसांनी ही सेवा शंभर दिवसांची झाली. ही शंभरीचा टप्पा म्हणजे एक प्रकारचा सुवर्णक्षण ठरला असून, भविष्यातही ही नियमितता आणि तत्पर सेवा अशीच सुरू राहील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

या सर्व यशात महिलांनी जे धैर्य, जागरूकता व सातत्य दाखवले, ते संपूर्ण खांदाडसाठी गौरवाची बाब आहे. त्यांचा प्रखर व ठाम आवाज हा या यशस्वी शंभरीचा पाया ठरला आहे. त्यांच्या सहकार्याविना ही नियमित सेवा शक्य नव्हती. त्यामुळे खांदाडच्या सर्व महिलांना मनःपूर्वक सलाम!