अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रविवारी पोलिसांना आलेल्या अलर्टनुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे…रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता. उजाडल्यानंतर आता ती संशयित बोट कोर्लईपासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक रायगड पोलिसांनी बोलावली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेट्टीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने रडारने शोधले होते…तेव्हा रविवारी दुपारी 3 वाजण्याचा सुमार होता. त्यानंतर केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो संदेश पोहचण्यास तब्बल सहा तास लागले.संदेश मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी सतर्क होत बंदोबस्त कडेकोट केला होता. रात्री दिसणाऱ्या प्रकाशा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला होता. परंतु सोसाट्याचा वारा , पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहचता आले नाही.असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी तीन वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर आल्याचे लोकेशन सापडत आहे. परंतु अशी कोणतेही बोट थेरोंडा जेट्टीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे लोकेशन शोधल्याने आता संशयित बोटीचे गुढ अधिक वाढले आहे. बोट आली होती. मग ती कितीवेळ जेट्टीवर थांबली. दुपारच्या वेळेत स्थानिकांच्या निदर्शनात ती बोट का आली नाही. आणि जर समुद्रात ती संशयित बोट असल्याचे संकेत मिळत असताना तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्या बोटीचा तातडीने शोध का घेतला नाही असे अनेक गुलदस्त्यात असणारे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान थेरोंडा येथे संशयित बोट आल्याचे रडारने सांगितल्याने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास थेरोंडा गावातील जेट्टीवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांबरोबर संपर्क साधला . परंतु अशी संशयित बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.