महाराष्ट्र राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी उरण चा  कु.आराध्या पुरोची निवड…

0
38

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-

             रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे रविवारी पार पडलेल्या १५ वर्षांखालील वयोगटातील बुद्धीबळ निवड स्पर्धेत उरण तालुक्यातील आराध्या रश्मी विनोद पुरो वयवर्ष ९ हिने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

आराध्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्पर्धेतील अनेक फेऱ्या आत्मविश्वासाने पार करत अंतिम फेरी गाठली आणि विजेतेपद पटकावत ऑगस्ट महिन्यात औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ स्पर्धेसाठी थेट निवड मिळवली. तिच्या या अपूर्व यशाबद्दल आयोजकांतर्फे तिला ट्रॉफी आणि रोख स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आराध्याच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यास, आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आणि तिच्यातील क्षमता फुलवण्यासाठी सतत प्रेरणा दिली.

उरणवासीयांकडून आराध्याच्या यशाचे कौतुक करण्यात येत आहे. अनेक स्थानिक संस्था, शाळा व खेळप्रेमी नागरिकांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.आराध्या पुरो हिचे हे यश उरण तालुक्यासाठी सन्मानाची बाब असून, येत्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती आणखी उज्वल कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.