जळगावच्या तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी साहेबांची राज्यभरात चर्चा… वाळू तस्करी रोखण्यासाठी थेट नदीपात्रात उडी घेतली…

0
22

जळगाव शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

सरकारी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते. तशी काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसलाही हलगर्जीपणा न करता समाजात आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत.सध्या अशाच एका तहसीलदार साहेबाची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी एकट्याने नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ धरणगावच्या तहसीलदारांचा आहे. जळगावात वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कपडे काढून थेट गिरणा नदीपात्रातून घेतली आणि तस्करापर्यंत ते पोहत गेले आहेत.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून बैठक आटोपून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी त्यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्यासं दिसून आलं. यानंतर महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचं वाहन उभे करून ते थेट नदीपात्रात उतरले. कपडे काढून नदीतून पोहत जाऊन त्यांनी वाळू चोरट्यांचा पाठलाग केला.चक्क तहसीलदार आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरी करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार तिथून पसार झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तहसीलदार साहेब पोहोत तस्करांपर्यंत जाताना आणि वाळू चोर घाबरून तिथून पळून जाताना या व्हिडीओत दिसत आहे.
वाळू तस्करीसाठी आडकाठी केल्यामुळे अनेकांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र कशाचाही तमा न बाळगता वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी एकटेच कारवाईसाठी नदीपात्रातून पोहत गेल्याचा या कारवाईच्या प्रयत्नाची तसेच त्यांनी दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे चर्चा रंगली आहे.