नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपच्या नांदगाव तालुका,शहर शाखेने जोरदार निषेध केला आहे.राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांना मानसिक उपचारांची गरज आहे असे विधान करत खालच्या पातळीवरची राजकीय टीका केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजपाचे नांदगाव तालुका अध्यक्ष संजय सानप, व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदगाव पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात लिखित तक्रार दाखल करण्यात आली.तालुकाध्यक्ष संजय सानप म्हणाले,संजय राऊत यांनी सातत्याने अपमानास्पद भाषा वापरून जनतेत द्वेष पसरवण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या विधानांमुळे राजकीय सौजन्य धुळीस मिळत असून समाजात तणाव निर्माण होतोय.आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तालुक्यात ,शहरात निषेधाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच आंदोलनाची हाक देण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.