माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
माणगाव शहराला स्वच्छतेचा प्रतिष्ठेचा मुकुट मिळाला असून, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये माणगाव नगरपंचायतीने गौरवाचे ‘ODF++’ (हागणदारी मुक्त प्लस प्लस) प्रमाणपत्र प्राप्त केले आहे… एप्रिल २०२४ मध्ये केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या पाहणी पथकाने माणगाव शहराची अचानक तपासणी केली…. यामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, रस्ते, नाले, घनकचरा व्यवस्थापन, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच नागरिकांच्या शौचालय वापराच्या सवयींचा सखोल अभ्यास करण्यात आला…. मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या माहितीनुसार, माणगावने सर्व अपेक्षित मानकांचे काटेकोरपणे पालन केले असून, शहरात स्वतंत्र मैलजल प्रकल्प यशस्वीरित्या कार्यरत आहे….
शहरातील सार्वजनिक शौचालयांची SBM टॉयलेट म्हणून गुगल नकाशावर नोंद करण्यात आली आहे. घरगुती व वाणिज्यिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविल्या जात आहेत…. माणगाव नगरपंचायत शहर अधिक हरित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे…. सध्या सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामार्फत कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्यावर भर देण्यात येत असून, महसूल वाढीचा मार्ग खुला होत आहे…. डंपिंग ग्राउंड संदर्भातही सक्रियपणे काम सुरू आहे…. शहराच्या सौंदर्यासाठी आणि उर्जासंवर्धनासाठी अडीच कोटी रुपये किंमतीचा सौरऊर्जेवर चालणाऱ्या डिजिटल पथदिवे आणि हायमास्ट लॅम्प प्रकल्प अंमलात आणला जात आहे… विशेष म्हणजे, माणगावमधील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता रात्रीच्या वेळीही केली जात असून, शहर पहाटे स्वच्छ व आल्हाददायक वातावरणात जागे होते….
या यशामध्ये नगराध्यक्षा सौ. शर्मिला सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, सिटी को-ऑर्डिनेटर अतुल जाधव, प्रमोद मोरे व प्रकाश मोरे यांचे अथक परिश्रम निर्णायक ठरले…. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे शहरात स्वच्छतेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी शक्य झाली…. हे ODF++ मानांकन म्हणजे केवळ एक सन्मान नसून, माणगावच्या स्वच्छतेच्या दिशेने सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे…. या बहुमानामुळे माणगाव नगरपंचायतीचे राज्यभरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे…. माणगाव शहराने या मानांकनाच्या माध्यमातून राज्यातील इतर नगरपरिषदांसाठी एक सकारात्मक उदाहरण प्रस्तुत केले आहे…. स्वच्छता, नागरी आरोग्य व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये माणगावने उभारलेला आदर्श खरच प्रेरणादायी आहे….