राजेश शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष उपाध्यक्षपदी निवड – अखिल भारतीय काँग्रेस पक्ष कडून कार्यगौरवाला मान्यता

0
7

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात मोठा बदल करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ज्येष्ठ नेते राजेश शर्मा यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी बढती दिली आहे. यापूर्वी शर्मा हे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. या निवडीची अधिकृत घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली… ही निवड राजेश शर्मा यांच्या काँग्रेस पक्षासाठीच्या निष्ठावान कार्याची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत करण्यात आली असल्याचे मानले जात आहे. या घोषणेनंतर राज्यभरातील पक्षनेते, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजेश शर्मा हे २०१२ पासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले असून, त्याआधी ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौरपद भूषवत होते.प्रशासन आणि लोकाभिमुख कारभारातील त्यांचा अनुभव पक्षाच्या कामकाजाला नेहमीच लाभदायक ठरला आहे. त्यांच्या कार्यनिष्ठेची आणि पक्षवाढीसाठीच्या योगदानाची ही बढती म्हणजे ठळक पावती मानली जात आहे. काँग्रेसमधील त्यांच्या नेतृत्वाची ओळख गेल्या काही वर्षांत बळकट होत गेली. नुकत्याच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यात निरीक्षक म्हणून त्यांनी घेतलेली कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. ६१ वर्षांचे असूनही त्यांचा उत्साही सहभाग, प्रभावी संवादकौशल्य आणि पक्षकार्याच्या बाबतीत असलेली स्पष्टता यामुळे ते सर्वांनाच प्रभावीत करत आहेत. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून शर्मा यांची ओळख आहे. भ्रष्टाचारविरोधी लढा, सामाजिक न्याय, तसेच वंचित घटकांसाठीची कल्याणकारी भूमिका यावर त्यांनी सातत्याने काम केले आहे. मासेमारी व्यवसाय, शालेय विद्यार्थी यांचे सुरक्षित इमारतीचे प्रसन, सुद्धा पिण्याचा मुबलक पाणी नागरिकांस मिळविण्याकरिता केलेली आंदोलन असो, गरीब रुग्णांसाठी आरोग्यसेवा यांसारख्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका लक्षणीय ठरली आहे. तसेच, अदाणी पॉवर लिमिटेडला एमएसईबी युनिट्स देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका विशेष चर्चेत आली होती. या बढतीमुळे राजेश शर्मा यांच्या याआधीच्या योगदानाचा सन्मान तर झाला आहेच, पण त्यांच्यावर पुढील काळात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व बळकट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी राजकीय लढतींच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही निवड काँग्रेस पक्षाच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.