अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
सेवांगण फाउंडेशनच्या वतीने अलिबाग तालुक्यातील ठाकर, आदिवासी व विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची मुले अशा सुमारे 110 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले…
या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेच्या संचालिका व अध्यक्षा मनिषा नाईक, सचिव विनायक नाईक आणि प्रकल्प समन्वयिका स्वप्नाली नाईक यांनी केले… या उपक्रमास ‘डोनेट एड सोसायटी, पुणे’ यांचे मोलाचे सहकार्य लाभले…
सेवांगण फाउंडेशन अलिबाग तालुक्यातील ठाकर, आदिवासी आणि विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे…. शिक्षणाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संस्था वाड्यावस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये आणि अत्यंत दुर्गम भागांमध्ये प्रत्यक्ष काम करते….
या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, ते शाळेत नियमितपणे जावेत, त्यांचे शाळेतील प्रमाण टिकून राहावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम पाया तयार व्हावा, या उद्देशाने सेवांगण फाउंडेशन कार्य करीत आहे….
संस्थेचा ठाम विश्वास आहे की शिक्षण व समावेशक विकासाच्या माध्यमातून ही मुले समाजाच्या व विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील. या दिशेने सेवांगण फाउंडेशनचे कार्य सातत्याने सुरू आहे….