वाहतुकीत सुरक्षेचा अभाव; लोखंडी सळ्यांमुळे पुन्हा अपघाताची टांगती तलवार…

0
11

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-  

गुरुवार दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:४५ वाजता माणगाव शहरातील एनएच-६६ राष्ट्रीय महामार्गावर, नगरपंचायतकडे वळण घेणाऱ्या एका ट्रॅक्टरने मोठ्या आकाराच्या लोखंडी सळ्यांची वाहतूक करताना कोणतीही लाल कापडी चेतावणी किंवा इशारा न देता मार्गक्रमण सुरू केले. ट्रॅक्टरने वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना, तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी सतर्कतेने शिट्टी वाजवून वाहन थांबवले. याचवेळी ट्रॅक्टरच्या मागे एक मोठा टँकर होता,आणि जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

त्याचवेळी आमच्या प्रतिनिधीकडून या घटनेचे त्वरित छायाचित्र घेण्यात आले.विशेष म्हणजे, त्याच वेळेस मोर्बा रोडकडे वळण घेणाऱ्या लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांपैकी तीन वाहनांवर कोणताही चेतावणी चिन्ह नव्हता, फक्त एका वाहनावर लाल कापड बांधलेले होते. शिवाय, मोर्बा रोड व खांदाड गावाच्या बाजूने मासळी बाजारसमोरील शॉर्टकट मार्गावरून जाणाऱ्या काही लहान चारचाकी वाहनांतूनही लोखंडी सळ्यांची चेतावनीशिवाय वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अलीकडेच अशाच एका घटनेत माणगावच्या एका प्रमुख चौकात लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या वाहनामुळे अपघात घडला होता. वळण घेताना त्या सळ्या मागून येणाऱ्या टमटम वाहनाच्या काचांवर आदळल्या होत्या. सुदैवाने त्या वेळी प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण ही घटना भविष्यातील गंभीर अपघाताचे संकेत देणारी होती. संबंधित वाहनावर पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली होती.

या सर्व घटनांवरून हे स्पष्ट होते की, लोखंडी सळ्यांची वाहतूक करताना वाहनचालक आणि वाहतूक यंत्रणांकडून सुरक्षा उपायांची पुरेशी अंमलबजावणी होत नाही. नागरिकांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी असून, अशा निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. म्हणूनच वाहतूक विभाग तसेच प्रशासनाने अशा वाहनचालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.