रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
मोहपाडा वासांबे गावचे माजी सरपंच, लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान देणारे संदीप मुंढे यांचा सुवर्णमहोत्सवी (५० वा) वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरात विशेष पूजाअर्चा करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मुंढे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, जिल्हा परिषद पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार,सर्वपक्षीय नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा देताना मुंढे यांच्या कार्याचा गौरव केला. सरपंचपदाच्या काळात मुंढे यांनी गावात पाणीपुरवठा योजना, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटार बांधणी, शाळेच्या इमारतीचा विस्तार, ग्रामस्वच्छता मोहीम अशा अनेक विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी केली. तसेच युवकांना खेळ व शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे आणि समाजातील वंचित घटकांच्या समस्यांवर तोडगा काढणे या सामाजिक उपक्रमांमुळे त्यांना गावात विशेष मान मिळाला आहे. मुंढे यांनी वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांचे आभार मानत, “गावाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी आजीवन योगदान देत राहीन,” अशी ग्वाही दिली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.