जेएसडब्लू स्टील लिमिटेड डोलवीच्या प्रकल्प विस्तारी करणाला शिवसेनेचा पाठिंबा… स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणीत चोख प्रत्युत्तर देऊ…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-

जे.एस.डब्लू कंपनीच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शविलाय.पेण,अलिबाग,रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र, सुशिक्षित बेरोजगारांना जे एस डब्लू च्या नव्या प्रकल्पाने रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाचा मार्ग अधिक व्यापक स्वरूपात निर्माण होणार आहे. त्यामुळे जे एस डब्लू च्या विस्तारीकरणाला शिवसेना (शिंदे यांनी) जाहीर पाठिंबा दर्शवित असल्याची भूमिका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आज हेमनगर येथील रायगड जिल्हा शिवसेना जनसंपर्क  कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. याचवेळी जे एस डब्लू च्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणार्यांना जनसूनावणीत शिवसेना  चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही यावेळी  शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिलाय. याचवेळी राजाभाई केणी यांनी जे एस डब्लू कंपनी व्यवस्थापनाला देखील निक्षून सांगितले आहे की प्रकल्पाला , विकासाला आमचा मुळीच विरोध नाही पण कंपनीने प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, व बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार स्थानिकांना रोजगारात प्रथम व अधिक प्राधान्य द्यावे अन्यथा आज पाठिंबा देणारा शिवसेना पक्ष उद्या तुमच्या विरोधात व स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्यास मागे पुढे बघणार नाही असा इशाराही राजाभाई केणी यांनी दिलाय. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाचे शिवसेना स्वागत च करेल, मात्र शेतकरी, स्थानिक, भूमिपुत्रांना 100 टक्के  न्याय देण्याची भूमिका  बडे भांडवलदार, उद्योजक विकासक  यांनी ठेवावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष केणी यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे, तुषार माणकवळे , जीवन पाटील ,संकेत पाटील  आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.