चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
मुंबई पुणे रस्त्यावरून चौक हद्दीत प्रवेश करणाऱ्या दत्त मंदिर रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे, त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. सद्या चौक बाजारपेठ मधील रस्ता आणि गटार यांची बांधणी सुरू असून, अनेक संघर्ष,वादविवादातून हा रस्ता पूर्णत्वास येताना दिसत असून स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ग्रामस्थ, पोलीस, व्यापारी, ठेकेदार यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मार्गी लागत असताना मुंबई पुणे रस्त्यावर चौक शहरात प्रवेश करणाऱ्या दत्त मंदिर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अंदाजे १०० मीटर अंतर असणारा हा रस्ता आहे. हा रस्ता ग्रामीण रुग्णालय चौक, ग्राम पंचायत कार्यालय चौक व तुपगाव कार्यालय, कनिष्ठ महाविद्यालय चौक, माध्यमिक शाळा, पशु वैद्यकीय दवाखाना, मंडळ अधिकारी चौक, तलाठी कार्यालय यांना जवळचा असून संपूर्ण बाजारपेठ मधून फिरण्यापेक्षा याच मार्गावरून रुग्णवाहिका यांची जा ये असते,तर अनेक रिक्षा चालक यांनाही सोयीचा आहे, याच मार्गाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा स्टँड, बस स्टॉप असून पायी चालत जाणारे याच मार्गाचा वापर करतात, याच रस्त्यावर ऐतिहासिक दत्त मंदिर आहे,शिवाय गणरायांचे आगमन सुखकर होण्यासाठी आणि रोज रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे शोधावे लागू नये म्हणून या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.