चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… कार्यक्रमाची सुरुवात मुंबई–पुणे रस्त्यावरील नढाल येथील काळंबा देवी मंदिराच्या आवारात झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, पो.उ.नि. शिवाजी जुंदरे, सरपंच प्रफुल्ल विचारे, आदिवासी समाज अध्यक्ष अनंता वाघमारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना चौक दूरक्षेत्र प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार म्हणाले, “शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. प्रत्येक आदिवासी बांधवाने शिक्षणात प्रगती केल्यास समाजाचा खऱ्या अर्थाने उद्धार होईल. भर पावसातही आदिवासी बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मोहपाडा, वावोशी, खालापूर, चौक, खोपोली येथून बाईक रॅली काढली. रॅलीनंतर खालापूर येथील आदिवासी भवनात वंदन करून खुल्या मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी सादर करण्यात आली. कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात प्रगती केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लोधीवलीचे उपसरपंच सदानंद हंबीर, चौक ग्रा.पं. सदस्य महादेव पिरकट यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थेसाठी चौक पोलिसांनी विशेष सहकार्य केले.